'या'च किल्ल्यातून जगाला 'कोहिनूर हिरा' मिळाला होता...

भारत एक असा देश ज्याची समृद्ध संस्कृती आणि वारसा यांनी साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे आकर्षूण घेतले आहे. जगातील लोकांना भारतातील प्रत्येक गोष्टींचे आकर्षण आहे मग त्यात आग्र्याचा ताजमहाल असो, किंवा हैदराबादचा चारमिनार, अगदी छोट्या गोष्टींचे सुद्धा मग त्यात मुंबईचा वडापाव असो किंवा नागपूरची संत्री. तसे बघायला गेले तर भारताच्या सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळी सांस्कृतिक परंपरा पहायला मिळते. त्यामूळे या सर्वांमध्ये काहीना काही नविन पहायला मिळणारच... आज मी तुम्हाला अशाच एका पर्यटन ठिकाणाबद्दल सांगणार आहे जे की, त्याच्या नवाबी संस्कृतीसाठी ओळखले जाते आणि महत्त्वाचे म्हणजे  तिथूनच जगाला सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक असलेला 'कोहिनूर हिरा' मिळाला होता. आज मी सांगणार आहे हैदराबादच्या 'गोवळकोंडा' या किल्ल्याबद्दल, चला तर मग...

golkonda fort haiderabad, kohinur diamond,fort, telangana forts
गोवळकोंडा किल्ला
भारताच्या तेलंगणा राज्यात हैदराबादच्या दक्षिण दिशेला ११ किलोमीटर अंतरावर 'गोवळकोंडा' किल्ला आहे. हा किल्ला आपल्या मौल्यवान खजाने, रहस्यमयी गुहा आणि भुयारांसाठी प्रसिद्ध आहे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी गोवळकोंडा येथील खाणीत 'कोहिनूर हिरा' सापडला. हा किल्ला १३व्या शतकामध्ये काकतीय राजांकडून बांधण्यात आला. भारतातील महत्त्वपूर्ण किल्ल्यांपैकी एक असलेला हा किल्ला आपल्या अद्भुत नवाबी संस्कृतीचे दर्शन घडवतो. येथे ओसाड बनवून असलेले महाल आणि मस्जिद आपल्या प्राचिन गौरवशाली प्रतिमांची गोष्ट सांगून जातात, तसेच येथील वास्तुकलांचे अवशेष आणि पडकी उद्याने एके काळी जगातील सुंदर आणि विविध फुलांनी आणि झाडांनी नटलेली होती त्या काळाचे आभासी रूप घडवून जातात. 

golkonda fort
ओसाड झालेले महाल
तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा किल्ला आता केवळ भग्न अवशेषरुपाने अस्तित्वात आहे, तर यात बघण्यासारखे काय आहे. तर मित्रांनो मलाही तुमच्यासारखाच प्रश्न पडला होता कि, मी पैसा आणि वेळ या दोन्ही गोष्टी खर्च करून हा पडलेला किल्ला पहायला का आलो असेल ? पण मी जेव्हा या किल्ल्याच्या आत जावून पाहू लागलो, गाईडकडून किल्ल्याबद्दल जाणून घेऊ लागलो तेव्हा या किल्ल्याकडे पाहून असा काही मोहीत झालो की, या किल्ल्याबद्दल लिहण्याचा मोह आवरू शकलो नाही.

गोळकोंडा किल्ला
गोवळकोंडा किल्ला हा चार वेगवेगळ्या भागांत विस्तारलेला आहे, ज्याची बाहेरील भिंत ही १० किमी अंतरावर आहे ज्यात ८ प्रवेशद्वार आणि ४ पूल आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्ये म्हणजे डोंगरावर असलेल्या दगडांचा पुरेपूर उपयोग, डोंगरावरील महाकाय दगड दुसरीकडे न हलवता त्यांच्यावरच भिंतींचे बांधकाम. त्यामुळे या भिंती एवढ्या मजबूत होत्या की, मुघलांच्या तोफादेखील त्यांना काही नुकसान पोहोचवू शकल्या नाही. आणखी एक आकर्षण म्हणजे या भिंतींवर केले गेलेले नक्षीकाम. हे नक्षिकाम करत असताना या सजावटींचा उपयोग किल्ल्याच्या संपूर्ण परिसरात गुप्त संदेश पोहचवण्यासाठी कसा केला जाईल याकडे लक्ष दिले गेले. 

stones wall
दगड न हलवता त्यावर बांधलेल्या भिंती

किल्ल्याच्या आत अनेक भव्य महाल, खोल्या, दरबार, मंदिर, मस्जिद, धान्याचे कोठारे, कारागृह, उद्याने आणि बरेच काही पहायला मिळते. 



दरबार

 धान्याचे कोठारे

येथील काही प्रमुख आकर्षणे आहे ते म्हणजे किल्ल्याच्या आतल्या परिसरातील भिंतींवरील कला, शिल्पकला, वास्तुकला, प्राचिन रंगमंच, प्रवेशद्वार आदी. येथे आजही ४०० वर्षांपूर्वीचा शाही बाग आहे. 

garden
शाही बाग

गोवळकोंडा किल्ला हा चमत्त्कारिक ध्वनी पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर वाजवलेली टाळी किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागात म्हणजे दरबारात, जो की काही किमी अंतरावर आहे तेथे ऐकू येते, या टाळ्यांचा उपयोग आपत्कालिन परिस्थितीची सूचना देण्यासाठी आणि प्रवेशद्वारावर आलेल्या पाहुण्यांची माहिती व्हावी यासाठी केला जात असे. आजही येथे हा अनूभव घेता येतो. या किल्ल्यात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे कुठल्याही यंत्राचा वापर न करता किल्ल्याच्या खालच्या भागापासून ते वरच्या भागापर्यंत पाणी पोहचवण्याची पद्धत, या पद्धतीला 'रहबान' असे म्हटले जात होते. पाणी पोहचवण्यासाठी सिमेंटच्या पाईपांचा उपयोग केला जात असे. हे पाईप किल्ल्याच्या भिंतींच्या आत असल्यामुळे काहीच ठिकाणी पहायला मिळतात. या किल्ल्यात एक रहस्यमयी भुयारी मार्ग, पण हा मार्ग नेमका कुठे आहे हे कोणाला ही माहीत नाही. तेथील काही लोकांना विचारले असता तो मार्ग दरबारातून असावा असे सांगतात. असे म्हणतात कि, या भुयाराचा उपयोग आपत्कालीन परीस्थितीमध्ये शाही परिवाराला बाहेर घेवून जाण्यासाठी केला जात असे. 

मार्ग
येथील आकर्षण म्हणजे संध्याकाळच्या वेळेस येथे दाखवण्यात येणारा 'आवाज आणि लाइट शो' या किल्ल्याच्या संघर्षाची गोष्ट आणि या किल्ल्यावर झालेले आक्रमण यांची माहीती चित्रपटाच्या रूपात दाखवली जाते. हा कार्यक्रम बघितल्यानंतर आज मृत अवस्थेत असलेला हा किल्ला त्याकाळी किती समृद्ध असेल याची प्रचिती येते, असो...कधी हैदराबादला येणे झाल्यास गोळकोंडा किल्ला पाहणे हे नक्कीच तुमच्यासाठी आनंददायी ठरू शकते.

कसे जाणार?
गोवळकोंड्याला तुम्ही विमान, रेल्वे आणि रस्ते या तिनही मार्गांनी जाऊ शकता. सिकंदराबाद रेल्वेस्थानक हे हैदराबाद येथील महत्त्वाचे स्थानक असून हव्या त्या वेळेस रेल्वे उपलब्ध असतात.




(सदरील लेख हा ETV Bharat यांच्या ईनाडू इंडिया ऑनलाईन वेबपोर्टलवर दि.१७ मे २०१८ रोजी प्रकाशित करण्यात आला होता.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'अमरत्त्व' प्राप्त असलेले वारंगळ येथील शंकराचे 'रामप्पा' मंदिर...

श्रीशैलम भटकंती