श्रीशैलम भटकंती


शहरातील रोजच्या जगण्याला कंटाळले आहात ? तिथली प्रदूषित हवा, गाड्यांचा आवाज, माणसांची गर्दी, तीच-ती ठिकाणे या सर्वांपासून कुठेतरी दूर जायचंय ? पण नक्की जायचं तरी कुठे ? जिथे माणसांची गर्दी नसावी, दृष्टी जाईल तिथपर्यंत निसर्गाचे सानिध्य असायला हवे, जिथे हिरव्यागार झाडांनी बहरलेल्या डोंगरांच्या उंचच उंच रांगा, त्या डोंगरांच्या कड्यांवरून वाहणारे झरे, आणि शेवटी त्या झऱ्यांना सोबत घेऊन वाहणारी नदी... चला तर मित्रांनो, कृष्णा नदीच्या काठावर या सर्व गोष्टी अनुभवायला, निसर्गाचे चमत्कार बघायला, निसर्ग काय असतो ते जाणून घ्यायला...

आज आपण बघणार आहोत, हैदराबादपासून २३२ किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून १३४५ फूट उंचीवर कुर्नूल जिल्ह्यातील नल्लामलाई डोंगररांगांच्या कुशीत वसलेले श्रीशैलम आणि जवळपासची पर्यटनस्थळे. श्रीशैलम हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही गिर्यारोहण, ट्रेकिंग, जंगल सफारी, नौकाविहार आणि बरेच अनुभव एका ठिकाणी घेऊ शकता. हे ठिकाण धार्मिक स्थळ आणि निसर्गरम्य ठिकाणांचे परिपूर्ण मिश्रण आहे. धार्मिक ठिकाणांमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले मल्लिकार्जुनाचे मंदिर तर निसर्गरम्य ठिकाणांमध्ये नल्लामलाईच्या कुशीतील जंगल आणि त्याच्या पायथ्याशी वाहणारी कृष्णा नदी. या ठिकाणी शंकराला पुजण्यासाठी भाविकही येतात आणि पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकही येतात. चला तर बघूया, श्रीशैलम येथील  पर्यटन स्थळांबद्दल -

श्रीशैलम धरण
srisailam dam, srisailam
श्रीशैलम धरण
श्रीशैलम शहरापासून अवघ्या १३ किलोमीटर अंतरावर नल्लामलाईच्या डोंगरांमध्ये कृष्णा नदीवर बांधलेले श्रीशैलम धरण. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प अशी या धरणाची ओळख आहे. कृष्णा नदीचे विस्तृत पसरलेले पाणी, बाजूला उंच डोंगर रांगा आणि समोर धरण असे रमणीय दृष्य तसेच सोबतीला सभोवतालचे वातावरण आणि निरागस शांतता या सर्वांमुळे आपल्या मनात या ठिकाणाबद्दल एक वेगळे असे आकर्षण निर्माण होते.

पाताळगंगा-
मंदिरापासून १ किलोमीटरच्या अंतरावर कृष्णा नदी आहे. खूप खोलवरून वाहत असल्याने या नदीला पाताळगंगा असे नाव पडले. नदीच्या एका कडेला तेलंगणा तर दुसऱ्या कडेला आंध्र प्रदेश अशा दोन राज्यांच्या सीमांच्या मधोमध वाहणारी ही नदी. तिच्या चारही बाजूंना डोंगर, त्याभोवती जंगल, असे मनमोहक दृश्य इथे पहायला मिळते. 
srisailam,sunrise,nature,sun
पाताळगंगेचे पहाटेचे दृश्य
नदीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या गेलेल्या आहे. सुमारे ५०० पायऱ्या उतरून गेल्यानंतर दिसते ते अद्भुत दृष्य. या ठिकाणी पोहचण्यासाठी रोपवेची सुविधासुद्धा देण्यात आली आहे. अल्पशा किमतीत रोपवेचा चित्तथरारक अनुभव घेऊ शकता. नदीजवळ आल्यानंतर तुम्ही बोटींगची मजा लुटू शकता.

boat,boating,krishna river
नौकाविहार
तुम्हाला जर वाटत असेल की, हे ठिकाण आयुष्यभरासाठी आपल्या लक्षात राहावे, तर त्यासाठी तुम्हाला थोडीशी तसदी घ्यावी लागेल. पहाटे लवकर उठून थोडेसे अंतर चालून ५०० पायऱ्या उतरून घाटावर जाऊन बसा. तिथे बसल्यावर समोर दिसते ते दूरवर पसरलेले पाताळगंगेचे पाणी. त्याच्या समोर श्रीशैलम बंदारा, आजूबाजूला हिरवेगार डोंगर आणि समोर उगवणारा सूर्य आणि त्याचे पाण्यात चमकणारे प्रतिबिंब. हे दृश्य बघितल्यानंतर सर्व चिंता, दु:ख, विचार, भावना विरघळून जातात. कृष्णेच्या संथ पाण्याकडे आणि सभोवतीच्या निसर्गाकडे बघतच बसावे, असे हे संस्मरणीय दृश्य वाटते.  

अक्का महादेवी गुहा

akkamahadevi caves
अक्कामहादेवी गुहा
अक्कामहादेवी गुहा श्रीशैलमपासून १८ किलोमीटर अंतरावर आहेत. अक्कामहादेवी गुहेपर्यंतचा प्रवास इतका सुंदर आहे, की तुम्हाला परत परत तोच-तो प्रवास करत राहावा असे वाटू शकते. या प्रवासादरम्यान तुम्हाला शहरातल्या मुख्य बस स्थानकापासून पूर्व दिशेला चालत जावे लागते. साधारण १ किलोमीटर अंतर चालल्यानंतर तिथून पाताळगंगेपर्यंत पोहोचण्यासाठी रोपवेची सवारी करावी लागते. 
ropeway
रोपवे

रोपवेमध्ये असताना दिसणारे दृश्य
५ मिनिटांची ही सवारी तुम्हाला कायमची लक्षात राहील. थोडा उत्साह, थोडा रोमांच यासोबत आजूबाजूला दिसणारे डोंगर आणि खाली कृष्णेचे पाणी असा थरारक अनुभव तुम्हाला मिळतो. हा अनुभव घेतल्यानंतर प्रवासाचा तिसरा टप्पा आहे तो म्हणजे बोट सफारी.खाली पाताळगंगेच्या कडेशी पोहचल्यानंतर आनंददायी अनुभव असतो तो बोटिंगचा. जवळपास १६ किलोमीटर अंतर तुम्हाला बोटीने जावे लागते. हे अंतर पार करण्यासाठी साधारण १ तास लागतो. दोन राज्यांच्या सीमांच्या मधून जात असताना दोन्ही बाजूंनी अफाट असे निसर्गसौंदर्य पाहायला मिळते. खाली पाताळगंगेचे थंडगार पाणी, वर निळेभोर आभाळ, सोबतीला हिरव्या मखमलीने दाटलेले पर्वत...हे सर्व पाहून तुम्हाला नंदनवनातून जात असल्याचा भास होतो. 
अक्कामहादेवीकडे जाताना
nature view,skyview
बोटीतून जात असताना बाजूचा नजारा
या प्रवासाचा आनंद घेतल्यानंतर तुम्ही अक्कमाहदेवी  लेणीच्या पायथ्याशी पोहचता, तेथुन तुम्हाला गुफांच्या समोर नैसर्गिकरित्या तयार झालेली कमान पहायला मिळते. या गुफांपर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला पायऱ्या चढून जावे लागते. या पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर दिसते ते  चित्तथरारक दृश्य. या ठिकाणी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहांपैकी प्रसिद्ध आहे ती अक्कामहादेवी गुहा. १२ व्या शतकात अक्कामहादेवी नावाच्या एक महान संत आणि तत्त्वज्ञानी होत्या. त्या या गुहेमध्ये तपस्या करत. तिथे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या शिवलिंगाची पूजा करत असत. त्यावरून या गुहांना अक्कामहादेवी गुहा असे नाव पडले. या ठिकाणी निसर्गाचा चमत्कार पहायला मिळतो. कुठल्याही आधाराशिवाय नैसर्गिकरित्या तयार झालेली कमान त्याची ऊंची सुमारे २०० x १६ x ४ फूट आहे.

नैसर्गिकरित्या तयार झालेली कमान
ही गुफा १५० मीटर खोल असून आतमध्ये त्यांची रूंदी कमी कमी होत जाते. कमानीनंतर गुहेच्या तोंडाशी अक्कामहादेवींच छोटसं मंदिर असून त्याच्या बाजूला थोडे आत मध्ये शंकराची मुर्ती पहायला मिळते.
            शंकराची मूर्ती आणि अक्कामहादेवी मंदिर
तेथे ज्या बोटीतून तुम्ही जाता त्या बोटीवरील कर्मचारी या गुहांची माहीती आणि त्यांचा इतिहास सांगतात. या गुहांच्या आतमध्ये अंधार असल्यामुळे मोबाईलची टॉर्च किंवा बॅटरी घेऊन जावे लागते, तुम्ही जस-जसे आत जाता गुहेची रूंदी कमी कमी होत जाते तस-तसे श्वास फुलायला लागतो आणि घाम यायला लागतो आणि अशावेळी तुम्ही जेव्हा वरती बघता तेव्हा तुम्हाला वटवाघळांचे लोंढेच्या लोंढे लटकलेले दिसतात. ज्यांना ह्रदयाचा त्रास आहे त्यांनी जरा विचार करूनच या ठिकाणी जावे.  अखेरीस पोहचल्यानंतर गुहेच्या आतमध्ये एका अरूंद जागेत शिवलिंग आहे त्याच्या पर्यंत पोहचण्याचा मार्ग एवढा निमूळता आहे की, एका वेळी एकच व्यक्ती त्या ठिकाणी जावू शकतो. या ठिकाणची गुफा संपुर्णपणे पहायला साधारण १ तास लागतो पण या १ तासांच्या कालावधीत तुम्ही निसर्गाला जवळून अनुभवू शकता.

अक्कामहादेवी गुहांच्या वरती जाण्यासाठी केलेल्या पायऱ्या

शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र -

shivaji mahraj mandir,shivaji maharaj,srisailam shivaj maharaj mandir
शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्र
हे स्फूर्ती केंद्र शहराच्या मुख्य बसस्थानकापासून १ किलोमीटरच्या अंतरावर आहे. ही एक अतिभव्य वास्तू असून या स्फूर्ती केंद्रात शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ साडेआठ फूट उंचीचा तांब्याचा पुतळा असून पुतळ्याच्या चारही बाजूंना घोड्यांचे पुतळे आहेत. या ठिकाणी महाराजांनी केलेले पराक्रम आणि त्यांच्या जीवनातील घडलेल्या काही प्रमुख घटना चित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या असून त्याखाली त्यांची माहिती देण्यात आली आहे.  स्फूर्तीकेंद्राच्या बाजूला ध्यान मंदिर आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा ध्यान करत असतानाचा पुतळा पहायला मिळतो. या ठिकाणी तुम्ही काही वेळ निवांत बसून ध्यान करू शकता. १६७४ शिवाजी महाराज श्रीशैलमला आल्यानंतर त्यांनी येथील आदिवासी लोकांना स्वराज्याच्या कार्यात जोडून घेतले असा उल्लेख आहे. त्या स्मरणार्थ आर.एस.एसने हे स्फुर्ती केंद्र उभारले आहे.

ध्यान मंदिर
आदिवासींचे संग्रहालय (चेंचू लक्ष्मी आदिवासी जमात संग्रहालय, श्रीशैलम) -

आदिवासींचे संग्रहालय
श्रीशैलममध्ये प्रवेश करताना रस्त्याच्या बाजूलाच हे आदिवासी संग्रहालय आहे. या ठिकाणी आदिवासी लोकांची जीवनशैली, त्यांची जीवन जगण्याची पद्धत आणि संस्कृती यांची झलक पहायला मिळते. हे संग्रहालय नरसिंग स्वामी यांची पत्नी चेंचू लक्ष्मी यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले आहे. या ठिकाणी चेंचू लक्ष्मी यांची मूर्ती बघायला मिळते. संग्रहालयाची इमारत शंकराच्या पिंडीच्या आकारासारखी बनवली असून त्यात दोन मजले आहे. 

शिवलिंगाच्या आकारासारखी इमारत
या संग्रहालयात आदिवासींच्या विविध गोष्टी पहायला मिळतात. त्यात देवतांच्या मूर्ती, आदिवासींच्या रोजच्या वापरातील वस्तू, संगीत वाद्य, त्यांची घरे आणि बरेच काही. संग्रहालयाच्या परिसरात आदिवासींच्या घराच्या प्रतिकृती, लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, पाळणे, मोठ्यांसाठी काही सेल्फीपॉइंट सुद्धा आहे. तेव्हा जे लोक अद्वितीय अनुभवाच्या शोधात आहे त्यांनी या ठिकाणी जरूर भेट द्या.

नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प -

व्याघ्र प्रकल्प
भारतातील सर्वात मोठ्या व्याघ्रपकल्पाला भेट देणे कदाचित हा तुमच्या आयुष्यातील अद्वितीय क्षण असू शकतो. यालाच श्रीशैलम वन्यजीव अभयारण्य म्हणूनही ओळखतात. या जंगलाने तेलंगणा राज्याचे पाच जिल्हे पसरले असून त्याचे एकूण क्षेत्र सुमारे ३५६८ चौ.किलोमीटर आहे तर या पैकी १२०० चौ.किलोमीटर भाग वाघांच्या सौंरक्षणासाठी राखून ठेवला आहे. हे व्याघ्रपकल्प अनेक जंगली प्राण्यांचे घर असुन वाघांसह येथे काळवीट, पिसूरी, हरीण, सांबर हरीण, चितळ, जंबुक, रानडुक्कर, चित्ते, अस्वले, रानटी कुत्रे यांच्यासह मगर, अजगर, वेगवेगळ्या प्रजातीचे साप देखील इथे आढळतात. तेव्हा ही जंगल सफारी तुम्हाच्यासाठी नक्कीच आनंददायी करू शकते.

केव्हा जाणार- 
श्रीशैलम आणि तेथील पर्यटन स्थळांना भेट देण्याचा सर्वात चांगला काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत. या कालावधीत तुम्ही कुटूंबासह, तुमच्या मित्रपरीवारासह निसर्गाची मजा लुटायला येऊ शकता. बाकीच्या इतरवेळी येथे तापमान बऱ्याच प्रमाणात जास्त असल्यामुळे येथे थंडीत किंवा पावसाळ्यात आलेले कधीही चांगले.

राहण्यासाठीची सुविधा-
श्रीशैलम शहरात देवस्थानाच्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या सदनांची व्यवस्था करण्यात आली असून तेथे कमी दरात तुम्ही खोली घेऊन राहू शकतात. या व्यतिरिक्त येथे हॉटेल्स आणि लॉजिंगदेखील उपल्बध आहे.
अल्पशा दरात राहण्यासाठी उत्तम खोल्या
कसे जाणार - 
हा संपूर्ण प्रदेश जंगलांनी व्यापला असल्यामुळे येथे विमानतळ किंवा रेल्वे स्थानक यांची सुविधा नसून या ठिकाणी रस्तेमार्ग चांगल्या व्यवस्थेत आहे. हैदराबादवरून तुम्हाला बसेसच्या सुविधा आहे. त्या व्यतिरिक्त खासगी वाहन किंवा तेलंगणा पर्यटन विभाग यांच्याकडून तुम्हाला श्रीशैलम टूर पॅकेजेसची सुविधा देण्यात आली आहे. 

(सदरील लेख हा २५ जून रोजी ETV Bharat यांच्या ईनाडू इंडियाच्या मराठी वेब पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला होता.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'अमरत्त्व' प्राप्त असलेले वारंगळ येथील शंकराचे 'रामप्पा' मंदिर...

'या'च किल्ल्यातून जगाला 'कोहिनूर हिरा' मिळाला होता...