'अमरत्त्व' प्राप्त असलेले वारंगळ येथील शंकराचे 'रामप्पा' मंदिर...

 Ramappa temple,Temple,ancient Temple,History,India
रामाप्पा मंदिर
 भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आणि इसवी सन १२१३ पासून आपल्या कलात्मक, अद्वितीय सुंदरता आणि भव्यतेने सर्वांना निरुत्तर करणारे वारंगळचे 'रामप्पा मंदिर'. हे मंदिर त्याच्या ऐतिहासिक समृद्धी आणि वास्तू गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या सभोवताली असलेले निसर्गसौंदर्य, तेथील तलाव या गोष्टी नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतात. आज आपण या मंदिराचा प्राचीन इतिहास, त्याची कलात्मकता आणि  सौंदर्य याविषयी जाणून घेणार आहोत... चला तर बघूया रामप्पा मंदिर...

हैदराबादपासून १६० किमी आणि वारंगळहून साधारण ६७ किमी अंतरावर मुलुग तालुक्यात पालमपेट या गाववस्तीच्या कडेला हे  शंकराचे 'रामप्पा मंदिर' त्याच्या ऐतिहासिक समृद्धी आणि वास्तू गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिराभोवतालच्या परिसरातील हिरवीगार झाडे आणि सभोवतालचे उंच डोंगर हे सर्वच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मंदिर आहे शंकराचे मग याला रामप्पा मंदिर का म्हणतात ? तर या मंदिराची माहीती सांगताना मंदिरातील गाईड व्यंकटेश ताडाबोईना सांगतात की... इसवी सन १२१३ या काळात आंध्र प्रदेशातील वारंगळ येथे काकटिय वंशाचे महाराजा गणपती यांना असे मंदिर बनविण्याची इच्छा झाली ज्याची वास्तू सुंदर हवी, ऊन-वारा-पाऊस यांचा काहीच परिणाम न होता हजारो वर्षे हे मंदिर चांगल्या स्थितीत असायला हवे. त्याप्रमाणे त्यांनी हे काम रामप्पा नावाच्या शिल्पकाराला दिले. रामप्पाने ४० वर्षे  ३०० कामगारांना सोबत घेत अथक मेहनत करून आपले कौशल्य पणाला लावून हे अभूतपूर्व मंदिर तयार केले. दिसायला अतिशय सुंदर पाहता क्षणीच नजरेत भरणारे हे मंदिर राजाला इतके आवडले, की त्याने बक्षीस म्हणून या मंदिराला शिल्पकाराचे नाव दिले. तेव्हापासून या 'रामलिंगेश्वर' मंदिराला 'रामप्पा' मंदिर म्हणून ओळखले जाते. संपूर्ण जगात हे एखादेच असे मंदिर असेल ज्याचे नाव देवाच्या नावाने न ठेवता शिल्पकाराच्या नावाने ठेवले गेले.

Ramappa temple,Temple,Ancient temple,History
सभा मंडप
मंदिराच्या बाहेर शाही बाग, वेगवेगळ्या प्रकारची हिरवीगार झाडे आहेत. पूर्वीच्या काळी ही बाग किती सुंदर असेल ते या  बागेचे अवशेष पाहिल्यावर कळते. हे मंदिर ६ फूट उंचीच्या पायावर बांधले असून या मंदिराच्या मजबुतीचे रहस्य म्हणजे  याच्या बांधकामात वापरण्यात येणाऱ्या विटा आणि दगड. या विटांचे वजन इतके हलके आहे, की त्या सहज पाण्यात तरंगू शकतात. तसेच या मंदिराच्या बांधकामात वापरण्यात येणारी 'सँड बॉक्स' टेक्निक या मंदिराला अनेक भूकंपाचे हादरे बसूनही सुरक्षित ठेवते.

royal garden,ramappa temple,ancient temple
शाही बाग
आज आपण सहज म्हणून जातो, की आम्ही २१००व्या शतकात म्हणजेच विज्ञान युगात जगत आहोत. विज्ञानातील  उपकरणांचा वापर करून निसर्गाच्या कोपापासून वाचणाऱ्या मोठ-मोठ्या इमारती बांधून आरामात आयुष्य जगत आहोत, पण मित्रांनो जेव्हा तुम्ही या मंदिराला भेट देता, येथे येऊन निसर्गसाधनांचाच वापर करून निसर्गाच्या कोपापासून वाचण्यासाठीचे तंत्र, जसे की अतिविनाशकारी भूकंपाचे धक्के सहन करणारी 'सँड बॉक्स' टेक्निक आदी पाहता तेव्हा आपण खरंच विकसित झाले आहोत का ? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही...

sandbox technique,ramappa temple
सँड बॉक्स टेक्निक
बाजूला मुख्य दरवाजासोबत एक संरक्षण भिंत आहे. पण भूकंपामुळे ती उद्धस्त झाल्याने त्याचे अवशेषच पहायला मिळतात.  मंदिरात प्रवेश करण्यासाठी ३ दरवाजे आहेत. पूर्व दिशेने मुख्य दरवाजा असून प्रवेशद्वारावर २ हत्तींच्या मूर्ती आहे. मंदिराबाहेर शंकराचे भलामोठा नंदी आहे. त्याच्यासमोर आहे ते प्रवेशद्वार.  प्रवेशद्वाराचे मुख्य आकर्षण म्हणजे दरवाजावर असलेले कोरीवकाम. संपूर्ण मंदिराभोवती १२ प्रकारच्या मूर्ती आहेत. त्यांना 'मदनिका' म्हणतात.

मदनिका
मदनिका
 या मूर्तींमध्ये एक 'नागिणी' आणि दुसरी 'रागिणी' ह्या मुख्य आकर्षण आहेत. नागिणी म्हणजे सापांना आपल्या अंगावर घेवून नृत्य करणारी नर्तकी आणि रागिणी म्हणजे नृत्यामध्ये विविध प्रकारचे राग आणि भाव दाखवणारी नर्तकी. या मंदिराची आणखी खास गोष्ट म्हणजे याठिकाणचे मार्ग दाखवणारे दिशादर्शक. मंदिराला प्रदक्षिणा करताना, मंदिरात प्रवेश करताना, बाहेर पडताना, मार्ग दाखवताना दिशादर्शक म्हणून हत्तीच्या नक्षीचा वापर करण्यात आला आहे. अशा संपूर्ण मंदिराभोवती जवळपास ५२६ हत्तींच्या नक्षी पहायला मिळतात.

दिशादर्शक
आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतो तो रंगमंच आणि त्याच्या भोवती ग्रॅनाइट दगडापासून बनलेले ४ स्तंभ. प्रत्येक स्तंभात ५ वेगवेगळ्या आकाराचे दगड आणि त्यांच्यावर केलेले कोरीवकाम बघण्यासारखे आहे. ४ पैकी ३ स्तंभांवर विविध प्रकारच्या नक्षी त्यात 'पेरीनी' हे पारंपरिक नृत्य करणारे नर्तक, नृत्यकला, संगीत वादन यांच्या नक्षी कोरलेल्या आहे. प्रत्येक स्तंभावर बारकाईने केलेले कोरीवकाम पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

स्तंभांवरिल कोरिव काम
स्तंभांवरिल कोरिव काम


येथे शिल्पकाराच्या कारागिरीचा उत्तम नमूना पहायला मिळतो, तो म्हणजे स्तंभावर नक्षिकांमध्ये कोरलेल्या बारीक काडी आरपार जाईल अशा खाचा.

स्तंभांवर वेगवेगळे नृत्य प्रकार


स्तंभांवर वेगवेगळे नृत्य प्रकार
या ४ स्तंभांपैकी एका स्तंभाकडे आणि त्याच्या बनावटीकडे पाहताना वाटू शकते, की शिल्पकाराकडून काम करताना त्याच्याकडून चूक झाली असावी... पण त्यामागे कारण असे, की या मंदिराचे निर्दोष सौंदर्य पाहून कुणाची दृष्ट लागू नये किंवा काही वाईट घडू नये, यासाठी त्या स्तंभावर कोरीवकाम न करता त्याच्या एका कोपऱ्याजवळ खळगा तयार केला आहे.

खळगा असलेला स्तंभ
रंगमंचाच्या मध्यजागी उभे राहून वर पाहिल्यास नटराजांची कलाकृती दिसते, त्याच्याभोवती इंद्र, यम, वरूण, सूर्य अशा वेगवेगळया दिशांच्या देवता म्हणजेच दिग्देवता आहेत. यासोबतच पुरातन कथा म्हणजे रामायण, महाभारत, अमृतमंथन, दिवाळी, शिवपुराण यांच्या कथा कोरलेल्या आहेत.

रंगमंचाचे छत- ज्यावर अनेक कथा कोरलेल्या आहे
 यानंतर आहे तो  मुख्य गाभारा. गाभाऱ्याच्या दरवाजाशी प्रवेश करताना कमानीवर सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या असून त्यात दोन्ही बाजूंना नृत्यातील ३० प्रकारच्या मुद्रा, वाद्य हातात घेतलेले वादक आदी कोरलेले आहेत. येथे अचंबित करणारी गोष्ट म्हणजे एक खास स्तंभासारखा दगड कोरलेला असून त्यातून ७ स्वरांचा आवाज येतो. इतर कोणत्याही दगडांतून असा आवाज येत नसल्याने असे का होते ? हा प्रश्न सर्वांना पडतो... दरवाजाच्या दोन्ही बाजूंना देवांच्या मूर्ती आहे.

दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या मुर्ती  

दरवाजाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या मुर्ती
गाभाऱ्याच्या आत ९ फूट उंचीचे शिवलिंग स्थापन केले आहे.या मंदिराची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मंदिर नैसर्गिक संकटे, वारंवार होणारे युद्ध, लूट व विनाश यांचा साक्षीदार असलेले हे मंदिर अजूनही आपले राजवैभव टिकवून उभे आहे. १७ व्या शतकात झालेला मोठा भूकंपदेखील मंदिराला हादरवू शकला नाही.
तेव्हा वारंगळला जाणार असाल आणि तुम्हाला निसर्गाच्या सौंदर्यासोबत इतिहासातील कलाकृती पहायच्या असतील तर रामप्पा मंदिराला नक्की भेट द्या. इतिहासात मंदिरांचे स्थान काय होते आणि मंदिरे ही केवळ श्रद्धेसाठी नसून त्यांचे काय महत्त्व होते, हे तुम्हाला अमर असे रामप्पा मंदिर पाहिल्यावरच कळेल...

केव्हा जाणार-
जाण्यासाठीचा उत्तम काळ म्हणजे पावसाळ्याचे दिवस... कारण पावसाळ्यात येथील नद्या, नाले, ओढे भरलेले त्यासोबतच डोंगरांवरून वाहणारे पाणी असे सर्व काही येथील सौंदर्यसृष्टीत भर घालत असतात. तसे बाराही महिने हे मंदिर खुले असते. तेथे मंदिराचा इतिहास, तेथील परीसरातील इतर पर्यटन स्थळे यांविषयी माहीती करून घेण्यासाठी तुम्ही गाईड देखील करू शकतात. तेव्हा सवडीने वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वेळ घालवण्यासाठी येऊ शकता.

कसे जाणार-
 तेलंगना राज्यात हैदराबाद शहरात गेल्यानंतर तिथून वारंगळला जाण्यासाठी रेल्वे, बस, खासगी वाहन इ. उपलब्ध आहे. रामप्पा  मंदिर वारंगळ पासून सुमारे 67 किमी दूर स्थित असून, मुलुग मंडळापासून १९ किमी अंतरावर असलेल्या पालमपेट  गावात आहे. तेथे मंदिरात जाण्यासाठी  हैदराबादहून वारंगळला जाणे आवश्यक आहे किंवा हनमंकोंडा पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. येथुन रामप्पा मंदिरापर्यंत सार्वजनिक बसेसने जाता येते. येथे आपण स्वत:च्या गाडीने सुद्धा जाऊ शकता.

(सदरील लेख हा ११जून २०१८ रोजी ETV Bharat यांच्या  'इनाडू इंडिया' या मराठी वेब पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला होता.)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीशैलम भटकंती

'या'च किल्ल्यातून जगाला 'कोहिनूर हिरा' मिळाला होता...